!!भारताचा प्राचीन इतिहास!!
आठव्या शतकातील इस्लाम धर्माचा व संस्कृतीचा हिंदू धर्माशी व संस्कृतीशी झालेल्या संपर्काचा व संघर्षाचा प्रारंभ म्हणून अरबांच्या भारतावरील स्वाऱ्यांना भारतीय इतिहासात विशेष महत्त्व आहे.
अरबांची एक टोळी ६३६-३७ मध्ये ठाणे येथे आली होती. त्यानंतरही अरबांनी ६४४, ६५९ व ६६४ मध्ये बोलन खिंडीतून भारतात प्रवेश मिळविण्याचे प्रयत्न केले होते. तथापि ७११ ची मुहंमद कासिमची सिंधवरील स्वारी हेच अरबांचे भारतावरील पहिले मोठे लष्करी आक्रमण होय.
अरबांच्या व्यापारास भारतीय चाच्यांचा होणारा त्रास, तसेच भारतात पळून आलेल्या अरबांनी खलीफाविरुद्ध चालविलेल्या चळवळी या स्वारीस कारणीभूत ठरल्या. श्रीलंकेच्या राजाने बगदादच्या खलीफास मौल्यवान शस्त्रे व दागिन्यांची भेट ज्या गलबतातून पाठविली ते गलबत सिंधमधील देवल बंदरात चाचे लोकांनी लुटले. हेच ७११ च्या मुहंमदाच्या स्वारीचे महत्त्वाचे कारण होय. खलीफाने दाहर राजाकडे नुकसानभरपाई मागितली; पण दाहरकडून ती न मिळाल्याने खलीफाने इराणचा सुभेदार हज्जाजतर्फे मुहंमद कासिमला मोठे सैन्य व साधनसामग्री देऊन सिंधवर स्वारी करण्यास पाठविले. मुहंमदाने देवल बंदरात येताच येथील हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस करून व होड्यांचा पूल बांधून सिंधू नदी ओलांडली व हिंदूंना बळजबरीने बाटविले.
सिंधचा हिंदू राजा दाहर व त्याचे मुलगे यांनी केलेली युद्धाची तयारी अरबांच्या मानाने तोकडी होती. मुहंमदाने दाहरचा पराभव करून सिंध प्रांत काबीज केला. या यशानंतर मुहंमदाने मुलतान सर करून दक्षिणेकडील भाग काबीज करण्यासाठी आपला सरदार अबू हकीम यास १०,००० स्वारांसह पाठविले. अरबांनी सैंधव-गुर्जरादी नृपतींचा पराभव करून ते दक्षिण भारत जिंकण्याच्या उद्देशाने नवसारीपर्यंत येऊन पोहोचले; पण तेथे चालुक्य धराश्रय जयसिंहाचा पुत्र अवनिजनाश्रय पुलकेशी याने प्राणपणाने लढून अरबांचा पराभव केला. प्रतिहार राजा पहिला नागभट्ट, राजपूत राजे व काश्मीरचे कर्कोटकवंशी राजे यांनीही शौर्याने लढून अरबांचा विस्तार थांबविला. अर्थात याच वेळी मुहंमद मरण पावल्याने अरबांच्या राज्यविस्तारास आळा बसला. पुढील ६०-७० वर्षांच्या काळात खलीफांची सिंधवरील सत्ता संपुष्टात येऊन अरब सेनाप्रमुखांनी सिंध व मुलतानवर आपली स्वायत्त सत्ता स्थापन केली.
स्टॅन्ली लेनपूल व सर बोलस्ली हेग यांच्या मते अरबांचा सिंधवरील विजय हे हिंदू धर्म व संस्कृतीच्या इतिहासातील एक उपाख्यान होय. अरबी विद्वानांनी भारतीय विद्वानांच्या साह्याने भारतात प्रगत अवस्थेत असलेल्या शास्त्रांचे ज्ञान मिळविले. खलीफा मन्सूर व खलिफा हारूनअल्-रशीद यांच्या काळात अनेक भारतीय विद्वानांना बगदादला बोलावून त्यांच्या मदतीने तत्त्वज्ञान, गणित, द्विविध ज्योतिषशास्त्र, वैद्यक इ. विषयांतील संस्कृत ग्रंथांचे अरबीत भाषांतर करण्यात आले व तेथूनच त्या ज्ञानाचा प्रसार यूरोपात झाला. प्रसिद्ध अरब ज्योतिषज्ञ अबू मशार हा बनारसला दहा वर्षे राहिला व त्याने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला, असा निर्देश अमीर खुसरौने केला आहे.
Comments
Post a Comment